गुहागर : गुहागर तालुक्यातील निवोशी गाव विद्युत समस्यांनी त्रस्त असून आगामी पावसाळ्यात गावाला अंधारात राहावे लागण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात असलेल्या या गावातील विद्युत वाहिन्या व पोल अनेक ठिकाणी जीर्ण झाले आहेत. दणदणे वाडीजवळ पालशेत-पोमेंडी मुख्य रस्त्यालगतचा एक मेन लाईनवरील पोल जमिनीपासून काही फुटांवर गंजलेला असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी फयान, अम्फान आणि तौक्ते चक्रीवादळांच्या वेळी निवोशीत अनेक विद्युत पोल पडल्याने गावाला महिनाभर अंधारात राहावे लागले होते. आता पुन्हा त्याच परिस्थितीतून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोंगरभागात अनेक जीर्ण पोल धोकादायक स्थितीत उभे आहेत. विशेष म्हणजे, मुख्य रस्त्यालगत असलेल्या या धोक्यादायक पोलाकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या धोकादायक पोलमुळे शेतकरी, पादचारी नागरिक आणि मुक्या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष देऊन मान्सूनपूर्व पालशेत-निवोशी दरम्यानच्या मुख्य तसेच सर्व्हिस लाईनची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा सुरळीत राहील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 20/May/2025













