रत्नागिरी, दि. २० मे २०२५ : रत्नागिरी शहरात मान्सूनपूर्व तयारीच्या कामांना गती देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) शहर मंडलाने केली आहे. शहरातील नालेसफाई, गटारे, वहाळ आणि इतर साफसफाईची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त मुख्याधिकारी श्री. गारवे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले.
शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नालेसफाईसाठी अधिक मनुष्यबळ लावून कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. पाणी साठणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात, तसेच रोगराई टाळण्यासाठी डास प्रतिबंधक फवारणी करावी, असेही सुचवले. याशिवाय, विविध योजनांसाठी खोदलेले रस्ते त्वरित बुजवून डांबरीकरण करावे आणि काँक्रीट रस्त्यांच्या बाजूच्या साइड पट्ट्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली. या कामांचा अभाव शहरवासीयांना त्रासदायक ठरू शकतो, असे शिष्टमंडळाने नमुद केले.
शहरातील विविध प्रभागांमधील समस्यांवरही चर्चा झाली. दादा ढेकणे, निलेश आखाडे आणि शैलेंद्र बेर्डे यांनी प्रभागनिहाय समस्या मांडल्या. यापूर्वीही भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला या समस्यांची माहिती दिली होती, परंतु त्यावर कार्यवाही बाकी आहे. या सर्व कामांना त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने लावून धरली. यावेळी मंदार खंडकर, संदीप सुर्वे, पल्लवी पाटील, सचिन गांधी, नितीन जाधव, संपदा तळेकर, शंकर शिंदे आदी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी शहराची तयारी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 20-05-2025














