लांजा : गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून सुरू असलेली लांजा आगाराची रत्नागिरी खोरनिनको ही बसफेरी कोणतीही पुर्व सूचना न देता अधून मधून बंद केली जात असल्याने प्रवासी वर्गासह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बसफेरी सुरळीत चालू न ठेवल्यास या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लांजा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी दिला आहे.
लांजा आगारातून गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून रत्नागिरी खोरनिनको ही बसलेली सोडण्यात येते. ही बसफेरी लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या खोरनिनकोसह अन्य गावातील विद्यार्थी, प्रवासी वर्ग यांच्यासाठी अतिशय फायदेशीर व उपयुक्त ठरत आहे पुर्व ग्रामीण भागातून रत्नागिरी पर्यंत जाणारी ही लांजा आगाराची एकमेव बसफेरी आहे. या बस फेरीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावातून रत्नागिरी येथे जाणारे महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचप्रमाणे हॉस्पिटल व अन्य कामासाठी जाणारे ग्रामस्थ, नोकरीने धंद्याच्या निमित्ताने जाणारे ग्रामस्थ यांच्यासाठी ही बस अतिशय उपयुक्त आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ही रत्नागिरी खोरनिनको बसफेरी अनेकदा कोणत्याही प्रकारची सूचना न देता सोडली जात नाही. त्यामुळे या बस फेरीवर अवलंबून असलेले विद्यार्थी, प्रवासी, ग्रामस्थ यांची मोठी गैरसोय होते. अचानकपणे कोणतीही पूर्व सूचना न देता ही बस फेरी बंद केली जात असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान प्रवासी, विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने लांजा आगार व्यवस्थापक यांनी रत्नागिरी खोरनिनको ही बसफेरी पूर्ववत चालू ठेवावी अशी मागणी प्रवासी संघटना अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 20/May/2025













