लांजा : कृषी विज्ञान केंद्र, लांजा येथे मृदा परीक्षण शिबीर तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अर्जुन ड्रोनचे प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि मृदा आरोग्याचे महत्त्व पटवून देणे हा या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कृषी विज्ञान केंद्र लांजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. ए. ए. हणमंते, कृषी तज्ज्ञ डॉ. महेश महाले, कीटक शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र दुबाळे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, फिलीप गावित आणि मनोज वामकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासोबत कृषी विभागाचे मंडळ अधिकारी श्री. गुरव आणि अनिल मोरे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये परिसरातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये फणस उत्पादकहरिश्चंद्र देसाई, आंबा उत्पादक अल्ताफ काझी, रिलायन्स फाउंडेशनचे अधिकारी राजेश कांबळे यांचा समावेश होता. या दरम्यान सलाम किसान या संस्थेकडून ‘अर्जुन ड्रोन’चे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणासाठी सुमित मुंगले मार्केटिंग मॅनेजर, ड्रोन पायलट-साहिल खेलकर आणि ड्रोन फ्रँचायझी मॅनेजर-उत्कर्ष शहारे हे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ड्रोनद्वारे औषध फवारणी व शेती निरीक्षणाचे परीक्षण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विशेषतः, अर्जुन ड्रोनचे प्रात्यक्षिक आंबा झाडांवर दाखवण्यात आले, जे सर्व प्रगतशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.
मृदा परीक्षणाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत असलेल्या पोषणतत्त्वांची माहिती मिळाली. याचा उपयोग त्यांनी योग्य खत व्यवस्थापनासाठी कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:56 PM 20/May/2025













