पावस : तालुक्यातील कुर्धे नदीवर बांधण्यात आलेला साकव गेले वर्षभर नादुरुस्त अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये लोखंडी साकव कोणत्याही क्षणी तुटण्याची शक्यता आहे.
कुर्धे गावातील महाविष्णू मंदिराजवळ नदी वाहते. या नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. पावसाळ्यामध्ये ये-जा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी साकव कार्यक्रमांतर्गत लोखंडी साकव बांधण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना पावसाळ्यामध्ये शाळेत जाण्यासाठी व इतर कामासाठी नागरिकांना जाण्यासाठी या लोखंडी साकवाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
त्यामुळे गेले अनेक वर्ष या साकवाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, परंतु या लोखंडी साकवाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे साकवाची दयनीय अवस्था झाली आहे. मागील वर्षी पावसाळ्यामध्ये साकव धोकादायक बनला होता. या संदर्भात तहसीलदारांनी पाहणी करून संभाव्य परिस्थितीचे माहिती करून घेतली आणि तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आणि पावसाळा संपल्यानंतर या साकवाची प्रशासनातर्फे योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले, परंतु हे देण्यात आलेले आश्वासन गेल्या दोन निवडणुकीच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकलले नाही.
मे महिन्यामध्ये काहीतरी काम होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती, परंतु पावसाळा आला तरी शासनाकडून कोणतेही हालचाली झालेल्या नाहीत. आता पावसाळा तोंडावर आल्यामुळे पुन्हा ग्रामस्थांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेतली आणि परिस्थिती समजावून सांगितली. त्यावेळी दुरुस्तीचे बघू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु काही दिवसांवर पावसाळा आला तरी दुरुस्तीचे नाव नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यामध्ये या दोन्ही भागाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
लिंगायत यांची तहसीलदारांशी चर्चा
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पपन लिंगायत यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘आम्ही या साकवाच्या दुरुस्तीसंदर्भात तहसीलदारांची भेट घेतली. त्यांनी लवकरात लवकर साकवाची दुरुस्ती करतो,’ असे आश्वासन दिले आहे. आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 20/May/2025













