रत्नागिरी, दि. २० मे २०२५: रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या रघुवीर घाट आणि जावळीच्या पहारेकऱ्या महिमंडणगडावर १८ मे २०२५ रोजी पावसाळ्यापूर्व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत गडावरील भैरी भवानी मंदिराला ताडपत्री लावण्यात आली, तसेच मातीच्या मलब्याने लुप्त झालेली पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. यापूर्वी गडावरील टाके, तटबंदी, बुरुज, पायवाटा यांची साफसफाई करण्यात आली असून, सूचना फलक आणि दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. संस्थेचे दुर्गसेवक महेश जाधव आणि ओमकार मोरे यांनी ही माहिती दिली. गणेश रघुवीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून गडावर संवर्धन कार्य सुरू आहे. मोहिमेचे नियोजन अमित भांबीड, प्रतीक शिर्के आणि साहिल भोसले यांनी केले. खेड, दापोली आणि मुंबई येथील दुर्गसेवक, ओमकार जाधव, संदेश वेदक, तेजस पटेल, अक्षय म्हस्कर, अथर्व पवार, संकेत आणि प्रणय सापटे यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
महिमंडणगडाचा थोडक्यात इतिहास: प्रतापगडाच्या पूर्वेला ३ किमी आणि माल्कमपेठच्या वायव्येला ५ किमी अंतरावर जावळी आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांत जावळीवर राष्ट्रकुट राजा अविधेय याची सत्ता होती. त्याच्या पांडरंगपल्ली ताम्रपट शासनात जावळा-वाटिका (जावळी) असा उल्लेख आहे. पंधराव्या शतकाच्या अखेरीस जावळी शिर्क्यांच्या ताब्यात होती. इ.स. १४८९-१५१० मध्ये चंद्रराव मोरे यांनी विजापूरच्या युसुफ आदिलशाहाच्या मदतीने जावळी ताब्यात घेतली. इ.स. १५०८-१५५३ मध्ये चंद्रराव मोरे यांनी निजामशहाविरुद्ध पंढरपूरजवळील लढाई जिंकून विजापूरकडून चंद्रराव ही पदवी मिळवली. इ.स. १६४९ मध्ये अफजलखान वाई प्रांताचा सुभेदार झाला, परंतु त्याला जावळी ताब्यात घेता आली नाही. डिसेंबर १६५५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी, सिमिलकर बांदल आणि कान्होजी जेधे यांच्यासह जावळीवर हल्ला केला. पहिला हल्ला मोरे यांनी परतवला, परंतु रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्या मागाहून झालेल्या हल्ल्यात हनमंतराव मोरे मारला गेला. २७ जानेवारी १६५६ मध्ये जावळी आणि महिमंडणगड स्वराज्यात सामील झाले. पेशवेकाळापर्यंत हा गड मराठ्यांकडे होता, नंतर १८१८ मध्ये इंग्रजांनी तो ताब्यात घेतला. गडपायथ्याशी एका अनामिक वीराची समाधी आहे, जो मोरे घराण्याचा असावा, असे ग्रामस्थ सांगतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 20-05-2025













