खेड शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

खेड : खेड शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या शौचालयांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या दुर्गंधीयुक्त शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरातील मराठा भवनसारख्या गजबजलेल्या ठिकाणी पालिकेच्या मालकीच्या जागेतील कॉम्प्लेक्सजवळ असलेले शौचालय अत्यंत बिकट अवस्थेत आहे. शौचालयातील घाण आणि मैला रस्त्यावर पसरत आहे. त्यातच या शौचालयांना दरवाजे नसल्यामुळे महिलांना या ठिकाणी जाणे अत्यंत गैरसोयीचे आणि लज्जास्पद वाटत आहे. त्यामुळे या शौचालयाची त्वरित दुरुस्ती करून ती कायमस्वरूपी दुर्गंधीमुक्त करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

खेड नगरपालिका ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असा नेहमीच गवगवा करते आणि जाहिरातबाजीवर मोठा खर्च करते. दरवर्षी शहरात स्वच्छतेचा पुरस्कार मिळवला जातो. मात्र, प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर कायम अस्वच्छता दिसून येते. कचरा गाड्यांवर स्वच्छतेचे संदेश देणारे ध्वनिक्षेपक मात्र सतत सुरू असतात. शहरातील गटारे नेहमी कचऱ्याने तुंबलेली असतात. त्यातच अवकाळी पावसामुळे गटारांमधील सांडपाणी कचऱ्यासह रस्त्यांवरून वाहत आहे. आता लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने गटारे आणि नाले स्वच्छ करणे ही पालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, पालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खेड शहरातील रस्त्यांची अवस्थाही अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. त्यातच सध्या पाणी योजनेच्या कामासाठी सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत.

यामुळे खेड शहरातील रस्त्यांची स्थिती ‘रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते’ अशी झाली आहे. गटारांमधील दूषित पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने पादचारी आणि वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे, अशी शोकांतिका खेड शहरात पाहायला मिळत आहे. नागरिकांनी पालिका प्रशासनाला त्वरित या समस्यांकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 20/May/2025