गुहागर मुख्याधिकारी पदावर पुन्हा स्वप्नील चव्हाण रुजू

गुहागर : येथील नगरपंचायतीवर काही महिन्यांपूर्वी थेट नियुक्त झालेले कायमस्वरूपी मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची २२ एप्रिलला ठाणे महानगरपालिकेमध्ये सहायक आयुक्त पदी बदली झाली होती. मात्र, त्यांनी हे पद सोडत तेथे झालेली बदली थांबवून गुहागरमध्ये सुरू केलेल्या नवीन विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी ते पुन्हा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदावर सोमवारपासून रुजू झाले आहेत.

गुहागर नगरपंचायतीला २०२१ पासून नियमित मुख्याधिकारी नव्हते. यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध उपक्रम रखडले होते. सहा महिन्यांपूर्वी येथे रुजू झालेल्या स्वप्नील चव्हाण यांनी गुहागरचा कारभार हाती घेतल्यापासून नियमितता आणली आहे. अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. अंतिम टप्प्यात आहेत. स्वच्छ शहर करण्याचे नियोजन आहे.

चव्हाण यांनी अनेक उपक्रम हातात घेतले असताना २२ एप्रिल रोजी त्यांची ठाणे महानगरपालिकेमध्ये सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी गुहागर नगरपंचायतीचे मुख्यालय सोडले होते. त्यानंतर त्यांनी येथेच कायमस्वरुपी नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला यश आले असून, त्यांची पुन्हा गुहागरचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 20/May/2025