खेडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस 

खेड : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने बरसायला सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे हापूस आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी मध्यरात्रीही तालुक्याच्या काही भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडणे, कौले फुटणे असे प्रकार घडले. मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्याने उष्म्याने हैराण झालेल्याना दिलासा मिळाला.

सोसाट्याच्या वाऱ्यासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे हा अंदाज खरा ठरेल, असे वाटत नव्हते. मात्र, मंगळवारी दुपारी दोन नंतर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने बरसायला सुरवात केली.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेड शहरालगत काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडण्याच्या घटना घडल्या. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणातील आंबा काजू ही पिके आधीच धोक्यात आली आहेत. कोकणी मेवा विक्रीसाठी घेऊन बसलेल्या खेड शहरातील तीनबत्ती नाक्यावरील व्यापाऱ्यांची मात्र या मुसळधार पावसामुळे त्रेधा उडाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 21/May/2025