पर्यटनस्थळांवर बंदी घालू नका : आमदार किरण सामंत

लांजा : पावसाळ्यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कडक कायदेशीर कारवाई करा; परंतु पर्यटनस्थळांवर अजिबात बंदी घालू नका. पर्यटनस्थळांवर छोटे व्यवसाय करून पोट भरणाऱ्यांचे यामध्ये नुकसान होते. पर्यटक पर्यटनस्थळांवर मस्ती करत असतील, तर त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी पोलिस प्रशासनाला केल्या.

लांजा तहसीलदार कार्यालय येथे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लांजा तालुक्याची मॉन्सून आढावा बैठक दुपारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आमदार किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय विभागांचा विभागावर आढावा घेतला.

मॉन्सूनमध्ये तालुक्यातील जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन करा. प्रत्येक विभागातील ज्या काही अडचणी असतील त्या तत्काळ निदर्शनास आणून द्या, त्यातून योग्य मार्ग काढला जाईल. सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात सतर्क राहावे, जनतेला सोयीसुविधा देताना हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशा सूचना सामंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 21/May/2025