संगमेश्वर बसस्थानकासह बाजारपेठेत चिखल

संगमेश्वर : मॉन्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले आहे. या पावसाने संगमेश्वर बसस्थानक आणि परिसरात चिखलच चिखल निर्माण झाला होता. त्यामधून मार्गक्रमण करणे प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले होते. बसस्थानक उभारताना गटारी बुजल्या गेल्याने पाणी निचरा न होता तिथे चिखल साचल्याचे दिसत आहे.

यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या वळवाच्या पावसामुळे महामार्गावर जागोजागी तळी साचलेली असतानाच संगमेश्वर येथे महामार्गाचे काम करताना ठेकेदार आणि महामार्ग विभाग यांच्या अक्षम्य चुकांमुळे दररोज वाहतूककोंडी होऊन वाहनचालक आणि पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

संगमेश्वर येथील गटारी एसटी बसस्थानकाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बुजवल्याने पहिल्याच पावसात चिखलाचे सर्व पाणी संगमेश्वर बसस्थानकासह अनेक दुकानात शिरले. ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गविरुद्ध तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना चालणेही मुश्किल झाले आहे यावर तातडीने उपाययोजना न केल्यास संगमेश्वरवासीयांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

चाकरमानी गावी आल्यामुळे संगमेश्वर बसस्थानकात सध्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अशा स्थितीत प्रवाशांना बसस्थानकात पसरलेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे चालणे आणि वाहतूक नियंत्रकांच्या खिडकीजवळ चौकशीला येणंही अशक्य झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित ठेकेदाराने संगमेश्वर बसस्थानक आणि बाजारपेठेतील चिखल काढून हा सर्व परिसर स्वच्छ करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात मोसमी पाऊस सुरू होत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला जोरदार पाऊस पडत असल्याने गटारे मोकळी केली नाहीत तर अडचण होऊ शकते. पाण्याचा निचरा झाला नाही तर आणखीन अडचणी निर्माण होतील. नियमित प्रवास करणारे प्रवासी तसेच विद्यार्थी यांना प्रवास करणे धोक्याचे होईल. पाणी साचून राहिल्यास प्रवाशांना उभे राहणेही अशक्य होईल. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

एसटी बसस्थानकातील गैरसोयीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. पहिल्या पावसाने झालेल्या चुका लक्षात आलेल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी पुढील आठ दिवसांमध्ये योग्य ती पावले एसटी महामंडळाने उचलली पाहिजेत. तसे न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही. – संतोष थेराडे, संगमेश्वर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 21/May/2025