स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान: लांजा बसस्थानकाची समितीकडून पाहणी

लांजा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील मूल्यमापन करणाऱ्या समितीने लांजा बसस्थानकाची बुधवारी पाहणी केली. पाहणीदरम्यान समितीने बसस्थानक परिसरातील सोयीसुविधांबाबत मूल्याकंन केले.

लांजा आगारात समितीने केलेल्या पाहणीत काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या. त्यात सुधारणा करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत तसेच बसस्थानक परिसरात असलेल्या चांगल्या सुविधांबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. या वेळी त्यांनी बसस्थानक परिसरात असलेली स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था, स्थानक परिसरातील स्वच्छता आणि अन्य सोयीसुविधांची पाहणी केली.

लांजा आगारात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचे सर्वेक्षण करण्याकरिता रायगड मूल्यांकन समितीचे सदस्य, विभागीय वाहतूक अधिकारी रायगड विभागाच्या मनीषा पाटील आणि विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी रायगड विभागाचे सुहास कांबळे यांनी मूल्यमापन केले. या वेळी लांजा आगारप्रमुख काव्या पेडणेकर, आगारातील इतर कर्मचारी तसेच प्रवासीमित्र प्रकाश मराठे, नसीर मुजावर हे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 21/May/2025