दापोली : इळणे आणि बोरथळ गावांना जोडणाऱ्या केसरी नदीवरील कॉजवेच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यांची मागील पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराने दुरवस्था झाली होती. रस्त्याची दुरवस्था होऊन दहा महिने उलटले तरीही वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला रस्ता अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
दापोली तालुक्यातील इळणे पवई केसरी पंचक्रोशीतील इळणे येथून बोरथळला जाण्यासाठी केसरी नदीवर एक कॉजवे बांधण्यात आला होता. या कॉजवेचा दोन्ही बाजूकडील जोडरस्ता गतवर्षीच्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेला. अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्याची १० महिन्यांत सुधारणा करण्यात आली नसल्यामुळे कॉजवेच्या जोडरस्त्यावरील माती वाहून गेल्याने दगडधोंडे, खाचखळगे वाहतुकीस अडसर ठरत आहेत.
इळणे गावाहून बोरथळ गावाकडे जाणाऱ्या या कॉजवेवरील मार्गामुळे इळणे तसेच वाधिवणे या गावातील लोकांना आंजर्ले, देहेण, सुकोंडी, पाजपंढरी, हर्णे तसेच दापोली तालुका मुख्यालयाकडे जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग आहे. शेतीच्या कामासाठी जाण्यासाठीसुद्धा हा सोयीचा मार्ग आहे; मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाला या रस्त्याची सुधारणा करण्यास १० महिन्यांचा कालावधी अपुरा ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 21/May/2025













