चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत रविवारी झालेल्या रिअॅक्टरचा स्फोट आणि भीषण आगीच्या दुर्घटनेत कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी कोल्हापूर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या चौकशीअंती प्राथमिक तपासात दोन्ही कंपनी व्यवस्थापनावर ठपका ठेवला आहे. फॅक्टरी अॅक्टनुसार, आता या दोन्ही कंपन्यांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
लोटेतील अॅक्विला ऑरगॅनिक कंपनीत रविवारी दुपारी झालेल्या रिअॅक्टर स्फोटात दोन कामगार जखमी झाले होते. त्यातील दिलीप दत्तात्रय निचते या कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या कामगारावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी दुपारी लासा सुपरजेनिक कंपनीत भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. एकाच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने लोटे परिसर हादरला. यामुळे कंपन्यांच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न निर्माण होणारे आहेत.
दोन्ही दुर्घटनांची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक संचालक नंदकुमार वेळे हे रात्रीच लोटे येथे दाखल झाले. त्यांनी सोमवारीही दोन्ही कंपन्यांमध्ये जाऊन या घटनी चौकशी केली.
दरम्यान, या दोन्ही दुर्घटनांचा प्राथमिक अहवाल औद्योगिक सुरक्षा विभाग कोल्हापूरच्या सहसंचालकांकडे पाठवला आहे. त्यामध्ये दोन्ही कंपनी व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्याबरोबरच कडक ताशेरेही ओढले आहेत. या विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लासा कंपनीत स्टोरेज टँकमधून एन प्रोपेलिंग हे सॉल्वंट पंपाच्या सहाय्याने २०० लिटरच्या ड्रममध्ये भरण्याचे काम सुरू होते. या वेळी हातातील होर्स पाईप ड्रममधून निसटल्याने सॉल्व्हंट जमिनीवर पसरले. तेथे बाजूला इलेक्ट्रिक पंप असल्याने त्याला आग लागली. बाजूला या सॉल्व्हंटचा साठाही होता त्यामुळे आग अधिकच भडकली; मात्र ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी जेवणाची सुटी असल्याने जबाबदार माणसे ही जेवणासाठी गेली होती. जाताना त्यांनी ठेकेदाराच्या दोन माणसांना उभे केले होते.
त्यामुळे अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासणीत कंपनी व्यवस्थापनाचा अक्षम्य हलगर्जीपणा दिसून आल्याचा ठपका या अहवालात ठेवला आहे. अॅक्विला ऑरगॅनिक कंपनी ही अद्याप सुरू झालेली नाही. त्याचे बांधकाम सुरू आहे. उत्पादन सुरू झाले नसले तरी जोडणी सुरू होती. त्यावेळी रिअॅक्टर क्लिनिंग करण्यासाठी डी नेचर्ड अल्कोहोल घेतले होते. क्लिनिंग सुरू असताना रिअॅक्टरच्या व्हेन्टमधून धूर आणि आग बाहेर आली. त्याच्याजवळच फॅब्रिकेशनचे काम सुरू होते. त्यामुळे सर्वतोपरी खबरदारी घेणे क्रमप्राप्त असतानाही ती घेतली गेली नसल्याचे पुढे येत आहे.
औद्योगिक सुरक्षा विभागाकडून केलेल्या चौकशीत दोन्ही कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. प्राथमिक अहवालात तसा ठपका ठेवला असून, फॅक्टरी अॅक्टनुसार संबंधितावर कारवाई केली जाणार आहे- प्रदीप भिंताडे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग, कोल्हापूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 21/May/2025













