खेड : शहरातील जगबुडी नदीपात्रातून अलोरे येथील जलसंपदा विभागामार्फत गाळ उपसण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत यंत्रणेने २३०५१ घनमीटर गाळ उपसा केला आहे. नाम फाउंडेशनच्या यंत्रणेचीही नारंगी नदीपात्रात दिवसरात्र घरघर सुरू आहे. आतापर्यंत नारंगी नदीपात्रातून ७९३५ घनमीटर गाळ उपसण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, नातूनगर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सत्यजित गोसावी, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बळवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाची यंत्रणा जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत गुंतली आहे. सकाळपासूनच दोन पोकलेन मशीनच्या सहाय्याने गाळ उपसा करण्यात येत आहे. जगबुडी नदीपात्रातील उपसलेला गाळ तातडीने शेतकरी स्वतःहुन वाहनांद्वारे उचलून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक करत आहेत. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा शिडकावही होत आहे. यामुळे गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने कमालीची गती घेतली अवहे. १६ मेपर्यंत ६२२४ ब्रास म्हणजेच १८ हजार ६१४ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. आतापर्यंत ८१४५ ब्रास म्हणजेच २३०५१ घनमीटर गाळ उपसण्यात यंत्रणेला यश आले.
नारंगी नदीपात्रातील उपसण्याच्या प्रक्रियेत नाम फाउंडेशनची यंत्रणा गुंतली आहे. यंत्रणेने नारंगीतून २८०४ ब्रास म्हणजेच ७९३५ घनमीटर गाळ उपसल्याने पात्राची खोली वाढली आहे. जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
पावसामुळे कामाला गती
जगबुडी नदीपात्रातून जलसंपदा विभागामार्फत गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपसा केलेला गाळ तातडीने शेतकरी स्वतः हुन वाहनातून घेऊन जात आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावही झाला आहे. त्यामुळे गाळ उपशाच्या कामाला आणखी गती मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 21/May/2025













