अचानक आलेल्या पावसामुळे दापोलीत नागरिकांची त्रेधा

दापोली : तालुक्याला पावसाने मंगळवारी झोडपून काढले. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तर त्रेधातिरपीट उडाली होती.

गेले काही दिवस दापोली तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाऊस पडेल, अशी स्थिती होती. ढगाळ वातावरणाबरोबरच ऊनही होते. त्यामुळे उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काळ्या ढगांनी आकाशात दाटी केली होती.

दुपारी तीन वाजल्यापासून गडगडाटासह जोरदार पावसाने सुरुवात केली. या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. मे महिना सुटीचा असल्याने बरेच चाकरमानी गावी आले आहेत. खरेदीसाठी चाकरमान्यांची बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्याने व्यापारी आणि नागरिकांची धावपळ उडाली. उन्हाळ्यात बाहेर ठेवलेले आगोटचे साहित्य भिजून गेले. काही ठिकाणी लाकडे प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 21/May/2025