गुहागर : गुहागर विजापूर महामार्गावरील प्रारंभबिंदूपासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या मार्गाच्या दुरवस्थेने सर्वजण बेजार झाले आहेत. प्रत्येकवेळी वेळ मारून नेणाऱ्या शासन यंत्रणेमुळे आता नागरिक संतप्त झाले असून, आता शासनाबरोबर संघर्ष करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन मंगळवारी नागरिकांनी गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांना दिले आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रांरभ बिंदू असलेल्या गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठ खड्डे पडले आहेत. या खड्यामध्ये पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले. चारचाकीच्या देखभालीचा खर्च वाढला. याबाबत नागरिकांनी बांधकाममंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पत्रव्यवहार केला. महामार्गाचे काम त्वरित व्हावे, यासाठी निवेदने दिली, उपोषणे केली. लोकशाहीदिनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले, त्यांच्या खोट्या आश्वासनांचा सर्वांसमक्ष चिरफाड केली. मात्र, शासकीय यंत्रणाकडून कोणतीही कार्यवाही आजतागायत झालेली नाही.
अखेर गुहागर नागरिक मंचद्वारे सोमवारी महामार्गाच्या कामावर आगामी दिशा ठरविण्यासाठी रविवारी सभा घेण्यात आली. या सभेत संतप्त नागरिकांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला टप्पा म्हणून २३ मे रोजी सकाळी १० वाजता ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन आज गुहागर नागरिक मंचद्वारे तहसीलदार परिक्षित पाटील, पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनाही देण्यात आले.
निवेदन मिळाल्यावर पोलिस निरीक्षक सावंत यांनी थेट राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी नागरिकांनी आंदोलन करून नये, आम्ही सभा आयोजित करतो त्यावेळी प्रत्यक्ष बोलू, असे अधिकाऱ्यांनी सावंत यांना सांगितले. मात्र, आता चर्चा नाही अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली. यावेळी दीपक परचुरे, अमरदीप परचुरे, दीपक कनगुटकर, नीलेश मोरे, नरेश पवार, दीपक शिरधनकर, साहिल आरेकर, सुबोध देवकर, संतोष सांगळे, शार्दूल भावे, सिद्धेश आरेकर, हर्ष बागकर आदी नागरिक उपस्थित होते.
मरणाची वाट पाहत आहात का ?
तहसीलदारांना निवेदन देतेवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता खुणेकर उपस्थित होते. त्यांना पाहताच संतप्त नागरिकांनी, अधिकार नसताना तुम्ही खोटी आश्वासने देता. खड्डे बुजविण्यासाठी तुम्ही खर्च केलेले १३ लाखांचे काम दाखवा. तुम्ही आमच्या मरणाची वाट पाहत आहात का. तुम्ही चुका करायच्या आणि त्याचा जाब विचारायला गेल्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायचे, हेच तुमचे कामं असून, तुम्ही एक नंबरचे खोटारडे अधिकारी आहात, अशा शब्दांत नागरिकांनी त्यांचा समाचार घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 21/May/2025













