लांजा : तालुक्यातील साटवली मुस्लिमवाडी येथे वीज वाहिन्यांवर आकडा टाकून खुलेपणाने वीज चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असताना महावितरणकडून मात्र कारवाई करण्या ऐवजी त्या प्रकाराला पाठीशी घातले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
साटवली मुस्लिमवाडी येथे वीज वाहिन्यांवर आकडा टाकून वीज चोरीचा प्रकार गेली अनेक वर्षे राजरोसपणे व बिनधास्तपणे चालू आहे. अनेक वेळा याची कल्पना महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना देऊन सुद्धा इकडे कानाडोळा केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे जेथून आकडा टाकून वीज चोरी केली जात आहे तो भाग हा रहदारीचा असून जिथून लाईन टाकली आहे तिथून हा भाग निदर्शनास येतो. याची कल्पना वेळोवेळी स्थानिक वायरमन यांना दिलेली आहे व त्यांना माहिती आहे. परंतु वीज चोरी करणाऱ्यावर मात्र आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी व अधिकारी या प्रकाराला पाठीशी घालत आहे की काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात कारवाई करण्यात टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
अशाप्रकारे खुलेआम सुरू असलेल्या वीज चोरी बाबत महावितरणचे अधिकारी आतातरी कारवाईचा बडगा उगारणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या बाबत महावितरणच्या लांजा येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता ही गोष्ट कानावर आली असून कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 21/May/2025













