प्राथमिक आरोग्य केंद्रात जलद उपचार मिळण्याची मागणी

आवाशी : जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील विविध गावात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित असले तरी सर्वच ठिकाणी सर्वच आजारांवर उपचार मिळत नाहीत. काही उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याने रहिवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

खेड तालुक्यात लोटे औद्योगिक वसाहतीमुळे आजूबाजूच्या गावांना किंबहुना या परिसराला संवेदनशील परिसर म्हणून संबोधले जाते. याठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सातत्याने गजबजलेले असते. जवळपास बारा गावे या आरोग्य केंद्रावर अवलंबून असली तरी काहीवेळा शीव आरोग्य केंद्रात समाविष्ट असणाऱ्या गावातील लोकही येथेच उपचारासाठी येतात.

पंचक्रोशीत औद्योगिक वसाहत असल्याने मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांमुळे इथे भटक्या श्वानांच्या संख्येत अनेक पटीने वाढ झाली आहे. अनेकदा या भटक्या श्वानांच्या हल्ल्याचा उपद्रव लोकांना सहन करावा लागतो.

अशावेळी घ्याव्या लागणाऱ्या लसीसाठी (प्राथमिक लस सोडून) चिपळूण येथील कामथे किंवा खेड येथील कळंबणी या उपजिल्हा रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. लोटे आरोग्य केंद्रात उपलब्ध असणाऱ्या ठरावीक साठ्याचा या सेवेवर परिणाम होतो. या सगळ्यात रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे येथे अधिकचा साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 21/May/2025