रत्नागिरी : येथील लोकांच्या मनात श्रध्दाभाव आहे. म्हणुनच कोकणात गुन्हेगारी कमी आहे. पशुपक्षी, जनावरांबद्दलही भूतदया येथे दिसून आली. ही संस्कृती कायम राखली पाहिजे. येथे देवराया शतकोत्तर टिकून आहेत, श्रध्दाभाव म्हणून निसर्ग टिकून असल्याचे उद्गार मावळते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे बदली झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी त्यांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप देण्यात आला. यावेळी रत्नागिरीतील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी नेहमीच पॉझिटिव्ह अॅप्रोचने काम केले. अधिकारी, कर्मचारी यांच्यावर न रागवता किंवा कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्याकडून चांगले कसे काम करुन घेता येईल हे त्यांनी पाहिले. वेगळ्या पध्दतीने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहता येते, अशी भावना अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केली. अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या कार्यप्रणालीचे सर्वांनीच कौतुक केले. शांत, संयमी व्यक्तीमत्व म्हणून कुलकर्णी यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सामाजिक समतोल ढासळू नये यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे मत चिपळूण येथील निराधार फाऊंडेशनचे नाझीम अफवारे यांनी व्यक्त केले.
केव्हाही फोन केला तरीही पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी फोन उचलला नाही, असे कधी झाले नाही. सर्वसामान्यांसाठी त्यांनी कार्यालयाचे दरवाजे खुले ठेवले होते. त्यामुळे जिल्हाभरामधून थेट त्यांना भेटण्यासाठी तक्रारदार येत आणि त्यांचे समाधानही होत असे अनेक मान्यवरांनी भावना व्यक्त करताना सांगितले. यावेळी अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे नितीन ढेरे आदी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 21/May/2025













