रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षात दहा हजार बालकांचा होणार पहिलीत प्रवेश

रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा दि. १५ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत दणक्यात तर केले जाणार आहे. स्वागतासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी शाळेला भेट देणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात १० हजार १२१ विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेणार आहेत.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे विद्यार्थी घरी आहेत. बहुतांश शाळांच्या एप्रिलच्या १५ तारखेपर्यंत वार्षिक परीक्षा घेऊन सुट्या देण्यात आल्या. काही शाळांना १ मे रोजी निकाल लागल्यानंतर सुट्या मिळाल्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी असले तरी शिक्षण विभागाकडून आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन सुरू झाले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त बालकाचा प्रवेश कसा होईल याबाबतही दक्षता घेतली जाणार आहे.

जिल्ह्यात २८१४ अंगणवाड्या असून, हजारो बालके यात आनंददायी शिक्षण घेतात. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी जी बालके पात्र आहेत, अशा बालकांनाही मोठ्या शाळेत प्रवेश घेण्याची उत्सुकता लागली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात पाच ते सहा वर्षे वयोगटातील १० हजार ५४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे यातील जवळपास दहा हजार बालकांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. पालकांचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, बालकांनी आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे, तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी शाळांना भेट देतील व विद्यार्थ्यांचे स्वागत करतील, याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.

पहिलीच्या वर्गात प्रवेश
पहिलीच्या वर्गात १०,१२१ विद्यार्थी प्रवेश घेणार असले तरी त्यामध्ये ५,००८ मुली व ५,११३ मुलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये पहिलीसाठी असलेली पटसंख्या वाढवण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी १०० शाळांना देणार भेट
शालेय शिक्षण विभागाने शंभर शाळांना भेट कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे अध्ययन, शालेय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, इतर सोयीसुविधा याबाबत आढावा घेणार आहेत.

६ वर्षे पूर्ण असावी
शासन नियमानुसार पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष पूर्ण असणे क्रमप्राप्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 21/May/2025