रत्नागिरी नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प २२ वर्षांनंतर मार्गी लागणार

रत्नागिरी : औद्योगिक विकास महामंडळाने घनकचरा प्रकल्पासाठी रत्नागिरी नगरपालिकेला चंपक मैदानातील सुमारे ५ एकर जागा दिली आहे. त्यामुळे गेली २२ वर्षे रखडलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या जागेसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सतत पाठपुरावा केला होता.

पालिकेने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळाल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत सर्व पालिकांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पालिकेने नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला होता; परंतु जागा मिळत नसल्याने प्रकल्प रखडला होता. दांडेआडोम येथील जागेचा प्रस्ताव मंजूर झाला. तिथे संरक्षक भिंतही बांधण्यात आली; मात्र पंचक्रोशीतील लोकांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाचा निकाल रत्नागिरी पालिकेच्या बाजूने लागला होता; परंतु राजकीय गणिते असल्यामुळे प्रकल्पाचे अंतर्गत काम थांबले.

पालिका निवडणुकीत हा मुद्दा शिवसेनेला त्रासदायक होण्याची शक्यता होती. त्यामुळे तो प्रस्ताव अखेर गुंडाळावा लागला; मात्र रत्नागिरी शहराजवळील औद्योगिक क्षेत्रातील चंपक मैदान येथे २० हजार चौ. मी. म्हणजे पाच एकर जागा रत्नागिरी पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी दिली आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्पावरून लक्ष्य करणाऱ्या विरोधकांचा एक मुद्दा मार्गी लावण्यात पालकमंत्र्यांना यश आले आहे.

रत्नागिरी घनकचरा प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून पालिकेला ५ एकर जागा मिळाली आहे. ती पालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. लवकरच प्रकल्पाचा आराखडा तयार केला जाईल- वैभव गारवे, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 22/May/2025