चिपळूण : काही दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला असून, मोसमीपूर्व पाऊसही पडत आहे; मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, काही ठिकाणी दिवसभर गेलेली वीज रात्री तीन-चार तासांसाठी येते. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती कामे, झाडांच्या छाटणीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
शहरी भागातील नागरिकांकडून एसी, पंखे, कूलर, फ्रीजचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी साधारण १५ टक्क्यांनी वाढली आहे. तालुक्यात कोणत्या ना कोणत्या भागात दररोज किमान एक ते दोन तास वीज खंडित होते. अतिरिक्त भार वाढल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरण करत आहे तर वाढलेल्या उष्णतेमुळे विद्युत रोहित्रांमधील तेल कमी होणे, काही यंत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असून, दुरुस्तीची कामे वाढल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
दिवसभरात दोन-तीनवेळा तरी वीजपुरवठा खंडित होत आहे. तुरंबव, खडपोली, तिवरे, सावर्डे, मार्गताम्हाणे, शिरगांव येथे महावितरणचे शाखा अभियंता कार्यालय आहे. त्या परिसरात कायमच वीज गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यांच्या गावात दुपारच्यावेळी अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित होत आहे.
वादळी वाऱ्यामुळे वीजवितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे तसेच सध्या पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे –अमित गेडाम, कार्यकारी अभियंता महावितरण, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 22/May/2025













