राजापूर : शहर आणि बाजारपेठेच्या विकासाच्या मुळावर येणारी नवीन पूररेषा शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर हा विषय राजापूरमधील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडला आहे. त्यामुळे पूररेषेबाबत ते कोणता निर्णय घेणार, याकडे राजापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.
राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुराचे पाणी शहरात घुसते. १९८१, १९८३ ला आलेल्या पूरस्थितीनंतर शहरामध्ये पूररेषा निश्चितीचा मुद्दा चर्चेत आला, प्रशासनाने सव्र्व्हेक्षण करून पूररेषा निश्चित केली. २००८ मध्ये पूररेषेचे फेरसव्र्व्हेक्षण करण्यात आले. पुढे २०२२ मध्ये नवीन पूररेषा निश्चित केली.
नवीन पूररेषा ही शहर विकासात अडचणीची ठरणार असल्याने व्यक्त केली जात आहे. शहरवासीयांसह नगरपालिका प्रशासनाला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने पूररेषा निश्चित केल्याचा सूर उमटत आहे. या पूररेषेला २०२२ मध्ये नगरपालिकेच्या सभागृहाने विरोध केला होता. तस्रा ठरावही केला आहे. तरीही जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित करून त्याबाबतचे मार्किंगही केले आहे.
नागरिकांना विश्वासात घ्या
नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत राजापूर शहरातील पूररेषेवरून आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शहरात दरवर्षी सतत येणाऱ्या पूरस्थितीच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने पूरेषा निश्चित केली. त्याबाबत नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. पूररेषेबाबत पाठवण्यात आलेला अहवाल नागरिकांना विश्वासात घेऊन पुन्हा तयार करण्यात यावा, अशी सूचना आमदार सामंत यांनी प्रशासनाला दिली आहे.
या प्रश्नाबाबत फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केल्यामुळे सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 22/May/2025













