नेवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची महावितरणवर धडक

रत्नागिरी : गेले १५ दिवस वादळीवारा व पावसामुळे नेवरे पंचक्रोशीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

पावसामुळे महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थ संतापले असून, त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. अधिकाऱ्यांना घेराओ घातला. गेले काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. याचा फटका जिल्ह्यात ग्रामस्थांना तसेच छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना बसत आहे. पावसाने त्रस्त झालेले ग्रामस्थ आता महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळले आहेत. नेवरे पंचक्रोशीत मंगळवारी (ता. २०) संध्याकाळी गायब झालेली वीज महावितरणच्या कारभारामुळे अजूनही गायबच आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांसह महिला, ज्येष्ठ नागरिक महावितरणच्या नावाने शिमगा करत आहेत. बिलांच्या थकबाकीवरून दारात दाखल होणारे महावितरणचे कर्मचारी ग्रामस्थांच्या समस्येवेळी विलंब लावताना दिसत आहेत. या सर्व प्रकारांना ग्रामस्थ वैतागले आहेत. याकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. दुकानदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 22-05-2025