चिपळूण : महामार्गालगतच्या गटारींची कामे जैसे थे

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या गटारी अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता खाली व गटारीची उंची वर अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीत जाणार नाही. रस्त्यावर पाणी साचून अपघाताची शक्यता आहे तसेच महामार्गालगतच्या गटारी अद्यापही जशाच्या तशाच आहेत. पावसाळ्यापूर्वी त्या साफ केल्या नाहीत, तर नागरिकांची गैरसोय होणार आहे.

बहादूरशेख ते पागनाकादरम्यानची जागा ही पालिकेच्या हद्दीत येते. या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने जी गटार बांधली आहेत. ती निकृष्ट दर्जाची असल्यामुळे आतमध्ये कोसळून गटारीमध्येच भराव झाला आहे. त्या गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करायच्या, पालिकेने की राष्ट्रीय महामार्ग विभागाने? ही जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निश्चित केली पाहिजे.

चालढकल करून एकमेकांच्या खात्याकडे बोट दाखवू नये. भविष्यात नागरिकांना त्रास होणार आहे. याबाबत शोकद मुकादम म्हणाले, पावसाचे पाणी गटारीतून जाऊच शकत नाही. संबंधित खात्यांना व अधिकाऱ्यांना हे माहित असूनही त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. हे योग्य नाही. गटारीवर काही ठिकाणी साफ करण्यासाठी जे कडप्पे बसवले आहेत त्या कप्प्यावर दोन-अडीच फुटाचा आरसीसी कप्पा उचलण्यासाठी लोखंडी हुक लावला आहे. त्या हुकामध्ये रस्त्याच्या बाजूने चालताना पाय अडकून अपघात होतो. लोखंडी हुकाची पद्धतही चुकीची असून, आरसीसी कप्पा उचलण्यासाठी आतील बाजूने खाच ठेवलेली नाही, तेथील गटारी कचऱ्याने तुडुंब भरल्यामुळे पावसाचे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. ते मोवाळे केले गेले नाहीत तर पावसाळयात अडचणी निर्माण होतील.

चिपळूण शहराबरोबर परशुराम ते असुर्डेलगत असणाऱ्या गटारीची परिस्थितीही बिकट आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर तातडीने उपाययोजना करून मार्ग काढावा. बेवारस गटारी कोणत्या खात्याकडे आहेत, त्यांनी ती त्वरित सफाई करून घ्यावी. – शौकत मुकादम, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 22/May/2025