लांजा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत आणि आपले गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करायचे आहे. त्यामुळे रागरूसवे बाजूला सारून आजपासूनच सर्वांनी कामाला लागा, अशा सूचना लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षफुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडल्याने त्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, महिला तालुकाप्रमुख पूर्वा मुळे, जिल्हा सहकार समन्वयक परवेश घारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कदम म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन काम करण्याची वेळ आली आहे. आपल्याला जर गेलेले वैभव प्राप्त करायचे असेल तर प्रत्येक पदाधिकाऱ्याने मेहनत केली पाहिजे.
या प्रसंगी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्याने यापुढे वेळ न घालवता आपापल्या विभागाच्या बैठका घेऊन गावातील शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा फडकवायचा आहे.
गटनिहाय बैठकांचे नियोजन
पुढील चार दिवसांत जिल्हा परिषद गटाप्रमाणे बैठका घेण्याचे लांजा येथील बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच रिक्त राहिलेल्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शाखाप्रमुखांपासून ते विभागप्रमुखांपर्यंत सर्वांनी बैठकांचे नियोजन करून तालुका कार्यालयाला कळविण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 22/May/2025













