रत्नागिरी : संग्रहालय उभारणे आणि ते चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. ते येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. यासाठी मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळवण्याची गरज असते. त्या मिळवायच्या तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संग्रहालयाचे महत्त्व आणि मूल्य पटवले गेले पाहिजे. या दृष्टीने संग्रहालय विषयातील जाणकार यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. हौसेपोटी एवढे मोठे काम ज्यांनी उभारले त्यांना हे अशक्य मुळीच नाही, असा विश्वास प्रज्ञा यांनी व्यक्त केला.
अशा संग्रहालयासाठी निधी आणायचा तर काय करावे लागते? जागतिक वारसा काय आहे, हे आपण जगापुढे ठसवण्यासाठी संग्रहालयातील वस्तूंची नोंदणी आवश्यक आहे. त्यांची उत्तम छायाचित्रे, व्हिज्युअल्स तयार करायला हवीत तसेच लेखी दस्तावेज याची गरज आहे. ते केल्यावरच जागतिक पातळीवर किंवा देशाच्या पातळीवर वस्तुसंग्रहालयासाठी निधी आणता येईल. कोकणात मिळणारा निधी अत्यंत तुटपुंजा असतो. याचा परिणाम संग्रहालयाच्या मांडणीला आलेल्या मर्यादामध्ये झाला आहे. म्युझियम असोसिएशन ऑफ इंडिया तसेच जे. कॉम या संस्था वस्तुसंग्रहालयाचे पुनर्निर्माण, पुनर्मांडणी यासाठी मदत करते. नॅशनल म्युझियम ऑफ इन्स्टिट्यूट ही संस्थाही मदत करू शकते; मात्र त्यासाठी गरज आहे ती संग्रहालयाची उभारणी आणि वाढ व्यावसायिक पद्धतीने करण्याची.
शास्त्रीय अभ्यास-चित्रकाराच्या दृष्टीचा मिलाफ
प्रज्ञा या संग्रहालय विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करत आहेत. या आधी त्यांनी झपुर्झा तसेच कल्चरल सेंटर येथे काम केले आहे. त्या चित्रकारही आहेत. लोटिस्माच्या कलादालनात कोकणातील दिग्गजांच्या चित्रांमधील कवी खावर आणि सोनोपंत दांडेकर यांची चित्रे त्यांनी काढली आहेत. त्यांचे पती गणेश कळसकर यांची तीन चित्रे तर राष्ट्रपती भवनात लागली आहेत. अभिनव कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेतलेल्या गणेश यांची दहा चित्रे कलादालनात आहेत. शास्त्रीय अभ्यास आणि चित्रकाराची दृष्टी याचा मिलाफ यामुळे संग्रहालयाच्या मांडणीत झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 22/May/2025













