संगमेश्वर : कडवई, वांद्री फीडरमधील दुरूस्तीत जंगलांचा अडथळा

संगमेश्वर : तालुक्यातील कडवई व वांद्री फीडरवर १२५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या वीजवाहिन्या आहेत. त्या बऱ्यापैकी जंगलातून जातात, त्यामुळे पावसाळ्यात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित झाला की, दुरूस्तीसाठी विलंब होतो. नुकत्याच झालेल्या पावसात हे अधोरेखित झाले आहे; परंतु ज्या वेळी वीजपुरवठा खंडित होईल तेव्हा तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते आणि जनमित्र प्रयत्न करतील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संगमेश्वरवासीयांना दिला.

तालुक्यातील आरवली अतिउच्च दाब उपकेंद्रात देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी सोमवारी (ता. १९) वीजपुरवठा खंडित केला होता. संध्याकाळी तो पूर्ववत केला गेला. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या पावसाने आणि विजेच्या गडगडाटाने संगमेश्वर, कडवई, धामणी व वांद्री फीडर फॉल्टी झाला होता. त्यातील रात्री २ वाजता सर्व ठिकाणचे फीडर जनमित्रांनी सुरू केले. दुसऱ्या दिवशी दुपारी पावसाने

कडवई व वांद्री फीडर बंद झाला होता. इतर सर्व ठिकाणी भरपावसातही प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले जाते. फक्त कडवई फीडरवर चार ते पाच ठिकाणी फांद्या पडून इन्सुलेटर फुटून फीडर बंद झाला होता.

त्यामुळे त्या परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. जनमित्र तेथील लाइनवर सार्यकाळी उशिरापर्यंत काम करत होते, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. कोकणातील सर्व वाहिन्या या जंगलातून जातात. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडूनही पावसाळ्यात फांद्या लाइनला लागून वीजपुरवठा खंडित होतो. हे प्रकार वारंवार होत असतात; परंतु ज्या ज्या वेळी लाइन बंद होते त्या त्या वेळी महावितरणचा जनमित्र व अभियंते रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत असतात.

संगमेश्वरमधील विशेषतः कडवई व बांद्री फीडर हे १२५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेले व बऱ्यापैकी जंगलातून जात असलेले फीडर आहेत. त्यामुळे इतर फीडरपेक्षा त्यांना जास्त अडचणी येतात. तरीही ज्या वेळी वीजपुरवठा खंडित होतो त्या वेळी तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते आणि जनमित्र प्रयत्न करतील, असे महावितरणकडून संगमेश्वर उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितले.

फोन उचलून किमान माहिती द्या
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेकवेळा ग्राहकांकडून महावितरणला दूरध्वनीद्वारे संपर्क केला जातो; मात्र, फोनच उचलला जात नाही. त्यामुळे वीज केव्हा येईल, याची माहिती मिळत नाही. त्यामधून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होते. वीज केव्हा येईल, याची माहिती मिळणे हीच ग्राहकाची अपेक्षा असते. याबाबत योग्य ती दखल घेतली जावी, अशी मागणी संगमेश्वरमधील नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 22/May/2025