चिपळूण : तालुक्यात सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे चिपळूण आगाराला मोठा फटका बसला आहे. आगाराच्या यांत्रिकी विभागाचे छप्पर गळके असल्याने, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे एसटी दुरुस्तीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि इतर साहित्य पूर्णपणे भिजले असून, कर्मचाऱ्यांना दुरुस्तीची कामे करणे अवघड झाले आहे. या गळक्या छपराच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
अवकाळी पावसाचा फटका
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. सकाळपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. तालुक्यात सर्वत्र कोसळणाऱ्या धुवाँधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका चिपळूण आगाराला बसला. आगाराच्या विस्तारित बसस्थानकात स्वतंत्र यांत्रिकी कार्यशाळा विभाग आहे, जिथे स्थानिक आगारासह इतर ठिकाणच्या नादुरुस्त बसेस दुरुस्त केल्या जातात. याच विभागाच्या गळक्या छपरामुळे पावसाचे पाणी आत शिरले आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले.
दुरुस्ती कामांमध्ये अडथळा
पाणी शिरल्यामुळे दुरुस्तीसाठीची साधनसामग्रीही भिजली, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एसटी दुरुस्ती करणे अवघड झाले. पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर यांत्रिकी विभागातील साचलेले पाणी काढण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा जोरदार मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होताच, कर्मचाऱ्यांना पुन्हा याच त्रासाला सामोरे जावे लागले. या गळक्या छपराविषयी वरिष्ठ स्तरावर अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांची आणि पर्यायाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे गळके छप्पर तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 22/May/2025













