लांजा : लांजा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वीजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना चांगलात आर्थिक फटका बसत असून गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजासह वीजेवर अवलंबून असणारे व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणत विरोधात लांजा तालुक्यातील नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण विभागाच्या गलथान करभारामुळे लांजा तालुका जेरीस आला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असते. अवकाळी पडणाऱ्या पावसमुळे तर लांजा शहरात कधी एक तास, कधी दोन तास तसेच ग्रामीण भागात दिवसभर किंवा रात्रभर वीजपुरवठा खंडीत होत आहे. हे सोडून अधूनमधून सतत वीज पुरवठा खंडीत होण्याला काही मर्यादाच राहिलेल्या नाहीत.
वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे नागरिक, व्यावसायिक, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये यांसह वैद्यकीय क्षेत्रातही क्ष-किरण, सोनोग्राफी यांची सेवा प्रभावित होत आहे. ग्रामीण भागातून लांजा शहरात उपचारासाठी तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचा यामुळे वेळ वाया जातो. त्यात प्रिंटिंग प्रेस, झेरॉक्स, पिठाच्या गिरण्या आणि वेल्डिंग कामाशी संबंधित उपकरणे बंद पडत असल्याने व्यावसायिक देखील त्रस्त झाले आहेत.
वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकाराने पाण्याचे रोटेशन बिघडते, वारंवार खंडीत होणाऱ्या वीजेमुळे सर्वाधिक फटका पाणीपुरवठा विभागाला बसत आहे. शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा सतत खंडीत होत असेल तर महावितरणचे नियोजन योग्य प्रकारे नसल्याचे सांगत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये महावितरण विरोधात प्रचंड रोष निर्माण होत चालला आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणणे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 22/May/2025













