रत्नागिरी : पेरणीपूर्व बियाण्यावर बीज प्रक्रिया आवश्यक

रत्नागिरी : पेरणी करण्यासाठी उत्तम प्रकारच्या व चांगल्या रुजवा असलेल्या बियाणाची निवड जशी महत्त्वाची आहे, तशी पेरणीपूर्वी बीजप्रक्रियासुद्धा आवश्यक आहे. बियाणावर जैविक खतांची किंवा रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. आधी रासायनिक व नंतर जैविक बीज प्रक्रिया केली जाते. रासायनिक बीजप्रक्रियेमुळे रोगांवर नियंत्रण व जैविक बीज प्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ होते.

भातावर बीज प्रक्रिया करताना तीन टक्के मिठाच्या द्रावणात बियाणे बुडवून द्रावणावर तरंगणारे बी काढून टाकावे. तळाशी राहिलेले जड बियाणे स्वच्छ पाण्याने दोनदा किंवा तीन वेळा धुवावे आणि त्यानंतर सावलीत २४ तास वाळवावे. नंतर एक किलो बियाणास २५ ग्रॅम या प्रमाणात ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली जाते. या पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यास उगवण क्षमता वाढते, शिवाय पिकाच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्यास मदत होते.

पाण्यावर तरंगणाऱ्या बिया काढून टाका
पेरणीपूर्व बियाणांची बीज प्रक्रिया करत असताना मिठाच्या द्रावणात बियाणे बुडवावे. द्रावणावर तरंगणाऱ्या बिया काढून टाकाव्यात तळाशी बसलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.

बीजप्रक्रिया आवश्यक
लागवडीसाठी बियाणे निवडताना दर्जा पाहिला जातो. महागडे बियाणे म्हणजे चांगला दर्जा नाही तर उत्तम रूजवा येणारे बियाणे निवडावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास खराब, रूजवा न घेणारे बी काढून टाकता येते.

बोगस बियाण्याची तक्रार कोठे कराल?
कृषी विभागातर्फे बोगस खते, बियाणे विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी नियुक्त भरारी पथकाकडे तक्रार करता येईल.

बियाण्यावर रोगप्रतिबंधात्मक उपाय काय कराल?
प्रतिकिलो तीन ग्रॅम या प्रमाणात थायरम बियाणामध्ये मिसळवून चोळून सावलीत वाळवावे.

खते, बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवा
खते, बियाणे खरेदी केलेल्या पावत्या शेतकऱ्यांनी जपून ठेवाव्यात. जेणेकरून तक्रार करणे सुलभ होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 22/May/2025