मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह रायगडला ‘रेड’ अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबईत यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावून एक विक्रम केला. मुंबई शहरात मान्सून दाखल झाला आणि हा दिवस मुंबईच्या इतिहासात सर्वात लवकर मान्सून आगमनाचा ठरला आहे.

याआधी सन 1956, 1962 आणि 1971 या वर्षांमध्ये 29 मे हा सर्वात लवकर मान्सून आगमनाचा दिवस नोंदवला गेला होता. मात्र यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. जोरदार पावसामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सकाळी दिलेला ‘ऑरेंज’ अलर्ट दिला होता. मात्र कालांतराने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयएमडीच्या कुलाबा वेधशाळेने 24 तासांत (सोमवार सकाळी 8.30 पर्यंत) 135.4 मिमी पावसाची नोंद केली, ज्याला “खूप जास्त पाऊस” म्हणून वर्गीकृत केले जाते. याउलट, सांताक्रूझ वेधशाळेने केवळ 33.5 मिमी पाऊस नोंदवला. कुलाबा वेधशाळेने मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रमही मोडला आहे. आतापर्यंत या महिन्यात 295 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधीचा विक्रम 1918 मध्ये 279.4 मिमी इतका होता. 2021 मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळादरम्यान पडलेला पाऊस देखील याहून कमी (२५७.८ मिमी) होता.

मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ब्रीच कँडी, केम्प्स कॉर्नर, सायन सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, जेजे मार्ग पोस्ट ऑफिस, कुरणे चौक, बिंदू माधव जंक्शन (वरळी) आणि फाईव्ह गार्डन्स येथे पाणी साचल्याची माहिती आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही या पावसाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु होती.

नव्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट असलेल्या परिसरात एकाच दिवसात अतिमुसळधार म्हणजे 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याशिवाय, सातारा आणि घाट परिसर, पुण्यातील घाट परिसर येथेही हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये या सर्व ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 27-05-2025