बिगरमोसमी अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात : आमदार भास्कर जाधव

चिपळूण : गेली १५ दिवसांपासून कोकणपट्टीत सुरू असलेल्या बिगरमोसमी अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. भात आणि नागलीच्या पेरणीची वेळ असतानाच झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतीची कामे थांबली असून, पेरणी करता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.

आमदार जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, कोकणात साधारणपणे २३ मे पासून भात व नागलीची पेरणी सुरू होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी हंगाम सुरू होतानाच या पावसावर भात व नागलीची रोपे तयार होऊन पाऊस स्थिरावल्यानंतर लावणीची कामे सुरू होतात. मात्र, यावर्षी १५ मे पासूनच सुरू झालेल्या आणि १९ मे पासून मुसळधार झालेल्या पावसामुळे नद्या-नाले पूरसदृश्य स्थितीत वाहत आहेत आणि शेतं पाण्याने भरली आहेत. पेरणीपूर्वीची मशागतीची कामेदेखील अपूर्ण असल्याने पाण्याने भरलेल्या शेतात मशागत आणि पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पेरणीचा प्रयत्न केल्यास भात वाहून जाण्याची भीती असल्याने यावर्षी भात आणि नागलीची पिके घेता येणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे.

रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रब्बी हंगामात भातपीक घेतले जाते. या पिकाची कापणीची कामे सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यामुळे उभी पिके आडवी होऊन तसेच कापून वाळत टाकलेले भात मातीत मिसळून पूर्णपणे वाया गेले आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने खरीपातील शेतीही करता येत नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे, असेही जाधव यांनी नमूद केले.

यावर्षी कोकणातील शेतकरी कधी नव्हे एवढा प्रचंड संकटात सापडला असून त्याला शासनाने धीर व दिलासा देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे आमदार जाधव यांनी म्हटले आहे. कोकणातील शेतकरी कितीही अडचणीत आला तरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत नाही, परंतु यावर्षीची परिस्थिती खूप गंभीर आहे. शेत रिकामे राहणार, काहीच करता येणार नाही, परिणामी खायचे काय, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, अशा अनेक प्रश्नांनी चिंतेत असलेला शेतकरी निराशेच्या गर्तेत जाण्याची आणि त्यातून त्याची मानसिकता बदलून त्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाईल काय, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्याचे जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.

या गंभीर परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि परावृत्त करण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून त्यांना सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 27/May/2025