या निवडणुकीमध्ये मतदारांनी क्रांती केली पाहिजे; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

मुंबई : दसरा, विजयादशमीनिमित्ताने राज्यभरात दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात एकूण चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे संध्याकाळी होणार आहेत.

त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. राज ठाकरे यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असं आवाहन केलं आहे. तसेच महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“दसऱ्याच्या शुभेच्छा आपण दरवेळी देतो. महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जातंय आणि आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही. बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत. पण आम्ही स्वतःमध्ये मश्गूल तर कधी जातीपातीमध्ये मश्गूल. आमचं या लोकांकडे लक्ष कधी राहणार. आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवेळी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपआपले राजकीय खेळ करत राहतात. याच्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते, पूल बांधणे ही प्रगती नसते. प्रगती समाजाची व्हावी लागते. परदेशातले देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. आपण चाचपडत आहोत. एवढं सगळं होऊनही तुमच्यातला राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चातापाचा हात डोक्यावर मारता,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“मतदानाचे शस्त्र तुम्ही वर ठेवता आणि नंतर बाहेर काढून बोलता. मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं? असं करुन राष्ट्र उभं राहत नाही. आज संधी आलेली आहे म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिलीत. या निवडणुकीमध्ये मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत ज्या लोकांना तुम्ही सांभाळले ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले. तुम्हाला गृहित धरलं गेलं. हे गृहित धरणं महाराष्ट्राचे नुकसान करत आलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बेसावध राहू नका. ही क्रांतीची वेळ आहे. गेली पाच वर्ष ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली, ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, वेड्या वाकड्या युती आघाड्या करत बसले. आज सगळेजण संध्याकाळी बोलतील. पण त्यात तुम्ही महाराष्ट्र नसणार आहे. मी अनेक वर्ष महाराष्ट्र साकारण्याचे स्वप्न पाहतोय. तो साकारण्याची मला संधी मिळू देत. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे. मतदानाच्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 12-10-2024