मुंबई : आज मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Shiv Sena Dasara Melava 2024) पार पडणार आहेत. ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा होता. तो परंपरेनुसार आज होईल. आता दसऱ्याला मेळाव्यांची लाट आली आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण शिवसेनेचाच म्हणाल तर तो शिवतीर्थावरचा मेळावा आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येत आहेत. मेळावे करत आहेत. पण ज्या शिवसेनेची स्थापना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि प्रत्येक दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी देशाला महाराष्ट्राला दिलं, ती माननीय उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे.
जनता मूळ शिवसेनेच्या सोबत
काही लोकांनी पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरले असेल. तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या सोबतच आहे. निवडणूक आयोग ठरवू शकत नाही की शिवसेना कोणाची आहे. कारण निवडणूक आयोग काही दिवसांनी निवृत्त होईल आणि जो मोदी शाहांच्या मेहरबानी वरच जगतो आणि चालतो. शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईतील आजचा दसरा मेळावा हा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज विचाराचे रणशिंग फुंकले जाईल आणि या रणशिंगापुढे पिपाण्या चालणार नाहीत. ज्या पिपाण्या आज वाजतील त्यांना काही काही अर्थ नाही. आज महाराष्ट्रातून आणि देशातून लाखो लोक येतील. नक्कीच आज एक दिशा महाराष्ट्राला लागेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली आणि विधानसभा सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मशाल सगळ्यात मोठं हत्यार
धनुष्यबाण आपल्याकडे राहिला नाही. येणाऱ्या काळात मशाल कशी पेटणार? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, धनुष्यबाण राहिला नाही म्हणण्यापेक्षा आमचा धनुष्यबाण मोदी आणि शाह यांच्या मदतीने चोरण्यात आला. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री चोरांना मदत करत असतील तर आज देश चोरांच्या हाती आहे असे म्हणावे लागेल. आमच्याकडे मशाल आहे ना. मशाल सुद्धा सगळ्यात मोठं हत्यार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात मशालीचा वापर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शिवरायांपासून मशालीला महत्त्व आहे आणि तीच मशाल आज आमच्या हातात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या लुटीला समर्थन दिले
राज ठाकरे यांनी पॉडकास्टमधून म्हटले की, महाराष्ट्रात लुटण्याचं काम सुरू आहे. येणाऱ्या काळात शस्त्र घेऊन मतदारांनी वचपा काढावा, याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते अगदी बरोबर बोलले. महाराष्ट्र लुटण्याचे काम चालू आहे. पण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. महाराष्ट्राची लूट कोण करत आहेत तर आजचे दिल्लीतील सत्ताधीश करत आहेत. खास करून व्यापारी मंडळाचे नेते मोदी आणि शाह करत आहेत. ते देशाचे नेते नाहीत. राज ठाकरे व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला उभे राहिले आणि एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या लुटीला समर्थन दिले, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
सत्तेवरील रावणाचे अखेरचे दहन
ठाकरेंच्या शिवसेनेकडून रावण दहन कशा प्रकारे केले जाणार आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, रावण सत्तेवर बसलेले आहेत. मुंबई लुटण्याचे काम सध्याचे रावण करत आहेत. त्याच्यामुळे रावणाचे दहन हे या वेळेला अखेरचे असेल. यानंतर महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असेही बोचरी टीका त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-10-2024