Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु

मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची (Baba Siddiqui Murder Case) जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे. फेकबुक पोस्ट करणारा शुभू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर (Shubham Lonkar) आहे का? याचा तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभू लोणकर ज्यांचे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.

शुभम लोणकरच्या घराला कुलूप, पुण्यात असल्याचा संशय

शुभम लोणकर हा मूळ अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरुक गावाचा रहिवासी आहे. दरम्यान, आता अकोला पोलिसांनी देखील लोणकर कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र, शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेल दिसून आलं आहे. त्याच्या घरी कोणीही नसल्याचं पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गावात नाही. तो पुण्यात असल्याचा संशय आहे.

शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याची चर्चा

विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल आणि 11 जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याच म्हटलं जातंय. 4 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातील वारजे भागातल्या भालेकर वस्तीतून अटक केली होतेय. बेकायदा शस्त्रविक्रीप्रकरणी अकोला पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती अकोल्याचे सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.

बाबा सिद्दीकी यांची हत्या…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला. या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique)यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारा वेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 14-10-2024