सहकारी संस्थांच्या व्यवहारात येणार पारदर्शकता

अलिबाग : ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी सहकार हे उत्तम माध्यम आहे. यासाठी काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्था असून त्यांच्या कामकाजात वेग, अधिक पारदर्शकता यावी, यासाठी नाबार्डच्या माध्यमातून देशपातळीवर संगणकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रतिसाद देत संगणकीकरण करणारी देशातील पहिली मध्यवर्ती बँक ठरली असून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कामगिरी कौतुकास्पद असल्‍याचे गौरवोद्‌गार नाबार्डचे अध्यक्ष शाजी के. व्ही. यांनी काढले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा शुक्रवारी (ता. ११) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला होता.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे सीजीएम संजयकुमार गुप्ता, सीजीएम रश्मी दराड, लेखापरीक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधवर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार किशोर दराडे, माजी आमदार दत्तात्रेय सावंत, नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदीप पराते, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागात ३० टक्के मंडळी शहरात व ७० टक्के मंडळी गावांमध्ये राहत आहेत. ग्रामीण जनतेला उत्पन्नाचे साधन खुले व्हावे, यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असून ग्रामीण भागातील विकास सहकारातूनच होणार असल्याचे शाजी के. व्ही. यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने शेतकरी, गरिबांना केंद्रबिंदू ठेवून काम केले आहे. या घटकाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आहे. त्यामुळे एक वेगळ्या उंचीवर बँकेचे कामकाज व सहकार नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात वीस हजार बचत गट आहे. या गटांना उभारी मिळावी, यासाठी बँकेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह महिलांबरोबरच जोडले गेलो आहोत. महिलांकडून कर्ज थकविले जात नाही.
– जयंत पाटील, अध्यक्ष, आरडीसीसी

राज्यात अनेक संस्था आहेत; परंतु जिल्हा बँकेकडून एक वेगळी अपेक्षा होती. त्यांनी ती पूर्ण करून एक वेगळा आदर्श अन्य संस्थांसमोर ठेवला आहे. कर्मचाऱ्यांनीदेखील चांगले काम केले. जिल्हा बँकेचे कामकाज आदर्शवत राहिले आहे.
– रश्मी दराड, सीजीएम, नाबार्ड

बचत गट, सोसायटी यांचे एकत्रीकरण व संगणकीकरण करणे सोपे नाही, ते जिल्हा बँकेने करून दाखविले आहे. संगणकीकरणातून सोसायटीचे जाळे निर्माण करून संस्था बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेकजण या संस्‍थेचे जोडले जाणार आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत संगणकीकरण केले जाणार, ही अपेक्षा होती. ती अपेक्षा बँकेने पूर्ण करून पथदर्शक काम जिल्हा बँकेने केले आहे.
– अनिल कवडे, राज्य सहकार निवडणूक आयुक्त

सहकाराबाबत चांगले ज्ञान असलेले जयंत पाटील हे चालते बोलते विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे सहकार एक मॉडेल म्हणून करण्याची जिद्द आहे. संस्था गतीमान व प्रगतिशील व्हाव्यात, हा दृष्टिकोन ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करीत आहेत. जिल्हा बँक संगणकीकरण करण्यामध्ये देशात पहिली ठरली आहे. संगणकीकरणामुळे कामकाज सहज व सोपे होणार आहे. कामात पारदर्शकता राहणार आहे. लेखा परीक्षणाचे कामकाज अधिक सुलभ होणार आहे.
– राजेश जाधव, अपर निबंधक, लेखा परीक्षण विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 14-10-2024