रत्नागिरी : येथे सलग चौथ्या वर्षी शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या संकल्पनेवर आधारित आषाढीवारी निघणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे ६ जुलैला सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून वारीला सुरुवात होईल. मारुती मंदिरतर्फे याचे आयोजन केले आहे. या वारीच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे हा कार्यक्रम झाला तसेच नियोजनाची बैठकही झाली. या वेळी रूची महाजनी, केवल सप्रे, नंदू चव्हाण, विराज चव्हाण, अॅड. अतुल नवरे, राधा चव्हाण, सुहास ठाकूरदेसाई, वैभव पांचाळ, जयदीप साळवी, अॅड. अमित काटे आदी उपस्थित होते. आषाढीच्या दिवशी शहरातील मारूती मंदिरपासून माळनाका, एसटी स्टैंडमार्गे, रामआळीतून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात वारी पोहोचणार आहे. पारंपरिक वेशभूषेत टाळमृदंग घेऊन आणि तुळशीवृंदावन डोईवर घेऊन वारकरी वारीत सहभागी होणार आहेत. अनेक वर्षे विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या; परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढीवारीचे आयोजन करण्यात येत आहे.
वारीमध्ये अभंग, नामजप, नित्यपाठ, विटूनामाचा जयजयकार करत ही वारी निघणार आहे. वारकरी, भाविकांनी पारंपरिक वेशात, टाळ-मृदुंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आषाढीवारी आयोजकांनी केले आहे.
बळ देणारी वारी
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत विठू माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी. आषाढी एकादशी आली की, वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. या वारीला जवळपास ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदातरी वारी घडावी, अशी माणसाची मनोमन इच्छा असते. प्रापंचिक समस्या, व्यावहारिक अडचणी, शारीरिक मर्यादा यामुळे वारीला जाणं होत नाही. त्यामुळे मनातली वारीची ओढ कमी होत नाही. असे अनेक वारकरी रत्नागिरीतल्या वारीत सहभागी होतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 12/Jun/2025














