वणवा फळलागवड योजनेला लागलेला शाप : सुरेश उपरे

सावर्डे : कोकणातील जंगलांना लागणारा वणवा हा फळलागवड योजनेला लागलेला शाप आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी जागरूक राहिले तर जंगलं सुरक्षित राहतील, असे मत नायशी येथे कृषिदिनानिमित्त आयोजित जागतिक पर्यावरणदिन व कृषी मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सावर्डेचे वनपाल सुरेश उपरे यांनी व्यक्त केले.

या वेळी उपरे यांनी वणवा टाळण्यासाठी कठोर पावले ग्रामस्थांनी उचलून वनविभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास वणवा लागण्याच्या प्रकारास आळा बसेल, असे सांगितले. या वेळी प्रथमच नायशी ग्रामपंचायतीतर्फे पाचवेवाडी वाघेश्वरी केदारनाथ सहाण, जिल्हा परिषद शाळा, वाघेश्वरी केदारनाथ ग्राममंदिर नायशी या ठिकाणी सरपंच संदीप घाग, वनपाल सुरेश उपरे, सामाजिक वनीकरण विभागाचे अर्जुन जाधव, चिपळूण तालुका कृषी सहाय्यक आकाश चव्हाण आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वनरक्षक संजीवनी जाधव, सामाजिक वनीकरणाच्या समृद्धी आरखटे, अरुण जाधव, संतोष कदम, रवींद्र गुरव, सरपंच संदीप घाग आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 12/Jun/2025