शालेय पोषण आहार खर्चात दरवाढ

चिपळूण : शालेय पोषण आहारासाठी प्रतिविद्यार्थी खर्चात दरवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी ६ रुपये ७८ पैसे तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी १० रुपये १७ पैसे दर निश्चित करण्यात आला आहे. मार्चमध्येही दरवाढ करण्यात आली होती. त्या तुलनेत आता पहिली ते पाचवीसाठी ५९ पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी ८८ पैसे वाढ झाली आहे. सुधारित दर १ मेपासून लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी १०० ग्रॅम, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो.

केंद्र शासनाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, मार्चमध्ये प्रतिविद्यार्थी खर्चाचे दर वाढवण्यात आले. त्या वेळी पहिली ते पाचवीसाठी ६ रुपये १९ पैसे तर सहावी ते आठवीसाठी ९ रुपये २९ पैसे दर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा ४ मार्च २०२५ ला केंद्र सरकारने प्रतिविद्यार्थी खर्चात दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी ६ रुपये ७८ पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी १० रुपये १७ पैसे असे दर वाढवण्यात आले आहेत.

दरवाढीनुसार पहिली ते पाचवीसाठीच्या ६ रुपये ७८ पैशांमध्ये धान्य माल पुरवण्यासाठी ४ रुपये १९ पैसे, तर इंधन, भाजीपाला यासाठी २ रुपये ५९ पैसे, तर सहावी ते आठवीच्या १० रुपये १७ पैशांमध्ये धान्यादी माल पुरवण्यासाठी ६ रुपये २९ पैसे, इंधन, भाजीपाला यासाठी ३ रुपये ८८ पैसे अशी विभागणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:59 PM 21/Jun/2025