“राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर…” : छत्रपती संभाजीराजे

नांदेड : गेल्या ७५ वर्षात सत्ताधारी असो वा विरोधक यांनी कुणीही गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केले, कुणीही मास्टरप्लॅन तयार केला नाही. हे किल्ले महाराजांचे विचार आहेत त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असं सांगत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले.

त्याशिवाय जर राज ठाकरे आणि मी या विषयावर एकत्र आलो तर नक्कीच महाराष्ट्राला चांगली दिशा देऊ शकतो असं मोठं विधानही संभाजीराजे यांनी केले.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, राज ठाकरे जे बोलतात, ते चुकीचे बोलत नाहीत. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन झालं होते तेव्हा मी स्वत: तिथे होतो. त्यावेळी ३ हजार कोटी स्मारकाला देणार म्हटलं होते, आज ते १५ हजार कोटींवर गेले. उद्या आणखी किती होतील..एकतर परवानग्या नसताना तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावले. हा फसवणुकीचा प्रकार आहे. गडकोट किल्ल्यांसाठी मागील ७५ वर्षात जे सत्तेत आहेत आणि जे विरोधक आहेत त्यांनी काय केले याचे उत्तर द्यावे. कुणीही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही केले नाही. रायगड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी मी पुढाकार घेतला तेव्हा प्राधिकरण स्थापन करण्यात आले. रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांचे संवर्धन थोडंफार झालं आहे. बाकी कुठल्या किल्ल्यांसाठी सरकारकडे काय मास्टरप्लॅन आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच केवळ हेच सरकार नाही तर मागील सरकारही त्यांनी गेल्या ७५ वर्षात छत्रपती शिवरायांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी काय मास्टरप्लॅन केला?. राज ठाकरे जे म्हणाले इथला पैसा किल्ल्यांच्या संवर्धनाला द्या तसं मी म्हणणार नाही. मुळात अरबी समुद्रात शिवस्मारक करण्याचा निर्णय का घेतला? याचे उत्तर द्यायला हवं. गडकोट किल्ले हे शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक आहेत. हे जिवंत स्मारक जर तुम्हाला खऱ्याअर्थाने जिवंत ठेवायचे असतील, या किल्ल्यातून महाराजांचे विचार येतात तर त्याचे संवर्धन झाले पाहिजे. मी स्वत: सरकारकडे २५ किल्ले जतन करण्यासाठी मागितले आहेत, या किल्ल्यासाठी सरकारकडून १ रुपयाही नको. आम्ही पैसे उभे करतो. मात्र सरकार द्यायला तयार नाहीत. त्यामुळे गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे. राज ठाकरे आणि मी जर या विषयावर एकत्र आलो तर महाराष्ट्राला चांगली दिशा देऊ शकतो असा विश्वास छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या आघाडीत राज ठाकरेंचा सहभाग?

राज ठाकरेंचं वेगळं व्यक्तिमत्व आहे, आमचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. राज ठाकरे तिसऱ्या आघाडीसोबत येतील हे नाकारूही शकत नाहीत आणि पुढे काय होईल हे सांगूही शकत नाही. राज ठाकरेंची ताकद आहे, त्यामुळे ते स्वबळावर निवडणूक लढवत असतील ही चांगली गोष्ट आहे. आमची नुसती सुरुवात आहे त्यामुळे आम्ही महाशक्ती निर्माण केली आहे. प्रस्थापितांपेक्षा विस्थापितांना आम्ही तिकीट देऊ हे सांगतोय. चांगले प्रस्थापित जर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना स्वीकारू असं सूचक विधानही संभाजीराजे यांनी राज ठाकरेंच्या तिसऱ्या आघाडीतील समावेशाबाबत म्हटलं.

दरम्यान, आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. महाविकास आघाडी, महायुतीकडून जर कुणाला तिकीट मिळाले नाही तर ते आमच्याकडे चाचपणी करत आहेत मात्र आमच्याकडेही उमेदवारी देताना तो घोडा व्यवस्थित पळू शकतोय का हे पाहिलं जाईल. चांगला उमेदवार असला तर स्वीकारू. अनेक इच्छुक महाशक्तीसोबत येण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो. सत्तेत आणि विरोधात हीच लोक आहेत. कुणीही ठोस धोरण अवलंबत नाही. कृषी, शिक्षण, सिंचन धोरणे पाहायला मिळत नाहीत. विचारधारेशी तडजोड केली जातेय. गोंधळाची परिस्थिती राजकारणात आहे. त्यामुळे हे स्वच्छ करायचं असेल तर त्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली आहे असं संभाजीराजेंनी सांगितले.

नांदेड येथे स्वराज्य पक्षाचं आंदोलन

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी अस्वस्थ आहे, दुष्काळाचे पंचनामे वेळोवेळी होत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. मागील पंचनामे झाले त्याचे पैसे अजून दिले नाहीत. नांदेडचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. सिंचनाचा नियोजित आराखडा नाही. नांदेडकरांना फटका बसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वराज्यकडून आंदोलन करण्यात आलं अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 14-10-2024