राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी : मनसेचा हिंदी सक्तीला विरोध

रत्नागिरी, १८ जून २०२५ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात दिलेल्या पत्राची आज रत्नागिरीत तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळाने शहरातील महत्त्वाच्या शाळांना भेट देऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली आणि हिंदी शिकवण्यास विरोध करण्यासंदर्भात निवेदन दिले.

मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, आणि शहर संघटक अमोल श्रीनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनांना ही निवेदने सादर केली. इयत्ता पहिलीपासून तिसरीपर्यंत सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच, असा राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश असल्याचे त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले.

यावेळी मनसेने शिक्षक आणि पालकवर्गाला देखील आवाहन केले की, मराठी माणूस म्हणून त्यांनी या हिंदी सक्तीला मनसे सोबतच विरोध करावा. शिर्के हायस्कूल, सॅक्रेड कॉन्व्हेन्ट हायस्कूल, विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल, पोतदार इंग्लिश मीडियम स्कूल यांसह शहरातील प्रमुख शाळांना हे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष सोम पिलनकर, रोहन शेलार, ॲड. माधवी पालकर आणि इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 18-06-2025