निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून पैसे नक्की घ्या, हे तुमचेच पैसे : राज ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाहीत, अशी टोमणा मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका मेळाव्यात त्यांच्यावर टीका केली. सारखं वाघनखं, इथून अब्दाली आला, तिथून शाहिस्तेखान आला, तिकडून अफझल खान आला, अरे महाराष्ट्राबद्दल बोल, असे ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरेंनी उपस्थितांना निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून पैसे स्वीकारण्याचे आवाहन केले. हे तुमचेच पैसे आहेत, नक्की घ्या आणि मनसेला मतदान करा, असे ते म्हणाले. त्यांनी या वेळी उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेंच्या राजकीय स्थितीवर स्फोटक टिप्पण्या केल्या.

त्यांनी काही उदाहरण देताना सांगितले की, हल्ली स्वागताचे हार बघितले की धडकीच भरते. एखाद्या दिवशी अजगरही घालतील. तसेच, मोबाइल कॅमेरामुळे झालेल्या अस्वस्थतेवर भाष्य करत त्यांनी विनोदाने म्हणाले, माझी राष्ट्रपतींकडे एक विनंती आहे. मला एक खून माफ करा, ज्याने मोबाइलमध्ये कॅमेरा आणला त्याचा मला खून करायचा आहे.

राज ठाकरेंनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि त्यांना आदरांजली वाहिली. जर रतन टाटांसारखा सरळ, साधा आणि सज्जन माणूस उद्योजक म्हणून आवडतो, तर तुम्हाला सरळ, साधा आणि सज्जन राजकारणी का नको? असे त्यांनी उपस्थितांना विचारले.

राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, जर लोकांनी योग्य निर्णय घेतले नाहीत तर महाराष्ट्र बरबाद होईल. अशी परिस्थिती कधीही नव्हती, असे ते म्हणाले. त्यांनी गद्दारांना निवडून आणण्याच्या मुद्द्यावर ताशेरे मारले आणि विचारले की, तुम्ही कुणामुळे निवडून आलात? कुणी तुम्हाला मतदान केलं?

उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवताना राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. एकनाथ शिंदे मै आया है, असं म्हणत दाढीवर हात फिरवतात, असे ते म्हणाले. त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत, आता राष्ट्रवादीत आहे, मग उबाठात जाईल, असा इशारा दिला. आपण येणाऱ्या पिढ्यांवर काय संस्कार करतोय?असे प्रश्न उपस्थित करत, राज ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाच्या गंभीर स्थितीचा इशारा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 14-10-2024