रत्नागिरी : श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान आणि टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त ‘टिळक आळी शतक महोत्सव जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२५-२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा २७ ते २९ जून या कालावधीत रत्नागिरी येथील महिला मंडळ हॉल, गणपती मंदिरा जवळ, टिळक आळी येथे पार पडेल. या वर्षीची ही पहिलीच जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा असून, ती एकूण आठ गटांमध्ये खेळवली जाईल: पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, ज्येष्ठ गट (पुरुष), कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा असोसिएशनकडे ५० रुपये नोंदणी शुल्क जमा करणे बंधनकारक आहे. प्रवेश शुल्क पुरुष आणि महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये आणि लहान गटासाठी १०० रुपये आकारले जाईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धक असणे आवश्यक आहे, अन्यथा तो गट रद्द केला जाईल याची नोंद घ्यावी. सर्व इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित जमा कराव्यात.
स्पर्धकांना सामना खेळताना पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करणे अनिवार्य आहे. या नियमाबाबत कोणतीही तक्रार नंतर स्वीकारली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीने खेळवले जातील, याचीही सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.
गुहागरसाठी प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरीसाठी विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूखसाठी राहुल भस्मे (९६५७६३७६७८) व श्री मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूणसाठी प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२) व दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वरसाठी मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजासाठी मनोज जाधव (७६२०११६७३६), खेडसाठी योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूरसाठी मनोज सप्रे (९४०३७६८३७६) आणि दापोलीसाठी माधव शेट्ये (९२०९७०९७९२) हे तालुका प्रतिनिधी असतील. या स्पर्धेसाठी साई प्रकाश कानिटकर, मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी यांची प्रमुख पंच म्हणून, तर मनोहर केळकर यांची स्पर्धा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, विश्वस्त अरुण करमरकर, मंदार खेर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, आणि खजिनदार नितीन लिमये यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 21-06-2025













