सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कोडमळा घाट उतरताना २० जून रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने अचानक ब्रेक लावल्याने ती स्लिप होऊन रस्त्यालगतच्या मोरीखाली गेली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
याप्रकरणी, मालाड वेस्ट, मुंबई येथील मीनाक्षी सचिन नेगी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे पती आणि कारचालक सचिन नेगी (वय ४२) हे त्यांची MH01 ER 7028 क्रमांकाची कार घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात होते. कोडमळा घाट उतरत असताना, त्यांनी रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता आणि अतिवेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवली.
मागाहून येणाऱ्या गाडीला साईड देत असताना सचिन नेगी यांनी अचानक ब्रेक लावला. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती स्लिप होऊन रस्त्यालगतच्या मोरीखाली जाऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातात कारमधील विंद्र सिंग आणि मीना नेगी (दोघेही रा. मालाड वेस्ट, मुंबई) यांना दुखापत झाली आहे.
चिपळूण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, सचिन नेगी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, वाहन चालकांनी विशेषतः घाटांमध्ये वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 21-06-2025













