संगमेश्वर : वीजवाहिनीवर कोसळलेला वृक्ष हटवला

संगमेश्वर : पावसामुळे तालुक्यातील तुरळ महावितरण शाखेच्या परिसरातील आरवली खिंड परिसरात ११ केव्ही वीजवाहिनीवर भलामोठा वृक्ष कोसळला. ही घटना गुरुवारी (ता. १९) रात्री ८ वाजता घडली. त्यानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा भलामोठा वृक्ष महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह कडवईतील तरुणांनी ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाजूला केला. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

कडवई परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. तो सुरळीत करण्यासाठी महावितरण तुरळ शाखेचे सर्व कर्मचारी कनिष्ठ अभियंता योगनाथ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत मेहनत घेत आहेत. वीजपुरवठा सुरळीत असतानाच आरवली खिंड परिसरात भलामोठा वृक्ष ११ केव्ही लाईनवर पडला. त्यानंतर पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे २ हजार ५७७ वीजग्राहकांना फटका बसला. हा वृक्ष ज्या ठिकाणी कोसळला होता, तो परिसर घनदाट जंगलात आहे.

मुसळधार पाऊस आणि काळाकुट्ट अंधार या परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी कडवई येथील तरुणांच्या मदतीने झाड बाजूला करण्यासा सुरुवात केली; परंतु महावितरण कंपनीची अपुरी साधनसामुग्री, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षासाधनांची कमी यामुळे कर्मचारी हतबल झाले. अखेर ही माहिती रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना कळताच त्यांनी कडवईतील युवक अमीरखान यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. अमीर यांच्या मदतीने कटरच्या साहाय्याने अखेर पहाटे चार वाजता हा वृक्ष हटवण्यात यश आले. त्यामुळे वीजग्राहकांची गैरसोय दूर झाली. यावेळी योगनाथ गोरे, सचिन कुंभार, युवराज गायकवाड, अक्षय कांबळे, सतीश मोहिते, सिद्धेश पडवळ, चेतन घरवेकर यांनी मेहनत घेतली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 21/Jun/2025