चिपळूण महावितरणवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धडक

चिपळूण : शहरासह ग्रामीण भागात सातत्याने होणाऱ्या अनियमित वीजपुरवठा आणि नादुरुस्त विद्युतखांब, ट्रान्स्फॉर्मर आदी तक्रारीबाबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये गैरसोय होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे सहायक कार्यकारी अभियंता राजकुमार कोंडल व नितीन कांबळी यांच्याशी चर्चा करत ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापन टीमबाबत, मुरादपूर सबस्टेशन, शहरातील झाडेझुडपे तोडणे बाकी काम, अतिरिक्त तक्रार निवारण फोन नंबर वाढवणे अशा अनेक तक्रारीबाबत सविस्तर चर्चा केली.

यावर त्वरित उपाययोजना व्हाव्यात व शहरांतील सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी पावले उचलावीत; अन्यथा पक्षातर्फे कठोर भूमिका घेतली जाईल.

वेळ पडल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करावी लागेल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. यावर अधिकाऱ्यांनी सर्वस्तरांवर योग्य ती उपाययोजना सुरू असून, आवश्यक त्या सुधारणा करू असे आश्वासन दिले. यावेळी शहर उपाध्यक्ष राकेश दाते, कादीर मुकादम, सेक्रेटरी मनोज दळी, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, परवेझ मेमन, महिला पदाधिकारी रूही खेडेकर, राधिका तटकरी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 21/Jun/2025