सीतेच्या वेण्यांनी निसर्गाला नवा साज !

संगमेश्वर : पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर जागोजागी उगवणारे हिरवे अंकुर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या संगमेश्वरसह रत्नागिरी जिल्ह्यात माळरानावरील उंच वृक्षांवर लोंबणाऱ्या गुलाबी, पांढऱ्या रंगाच्या सीतेच्या वेण्या निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. आठवडाभर लक्ष वेधून ताजेतवाने राहणारे हे फुलोरे पाहिले की, नेत्र तर सुखावतात याशिवाय त्याचा गंध हृदयापर्यंत पोहोचत असल्यामुळे मनही सुगंधी बनते. निसर्गातील हे सौंदर्य जपणे पर्यावरण संवर्धनासाठी गरजेचे आहे.

कोकणात मोगरा, चमेली, अबोलो, सुरंगी, जाई-जुईसारख्या असंख्य गंधीत फुलांचे गजरे केसात माळणं म्हणजे एक निसर्गनिर्मित दागिना मानला जातो. गंधीत फुलांचे गजरे सोन्याच्या दागिन्यांनादेखील फिके पाडतात. गजऱ्याची फुलं फुलली की, सुगंध आणि सौंदर्य या दोन्हींच्या मिलाफामुळे गजऱ्यांना मोठी मागणी असते. गजरा घेण्यासाठी आधी गंधाजवळ खोलवर नातं जडलेलं असावं लागतं. गजरा माळण्यासाठी या गंधीत फुलांप्रती कृतज्ञता असावी लागते. वर्षाऋतूची चाहूल लागली की, रानफुलं हळूहळू प्रकट होऊ लागतात. रस्त्याच्या बाजूने लावलेले जुने वटवृक्ष, आंबे अशी मोठी झाडं या ऑर्किडची जन्मस्थान असतात. त्यांच्या जीर्ण झालेल्या फांद्यांवर ऑर्किडची लहान पानं आणि छोटीशी मुळे दिसतात. हवेतील बाष्प शोषून त्यावर जगणारी ही झाडं फोटो सिंथेसिसने आपलं अन्न बनवत असतात. त्यामुळे ती पूर्ण परोपजीवी नाहीत.

सीतेच्या वेणीच्या फुलांचा पांढरा, फिक्कट गुलाबी असा आकर्षक रंग या फुलांवर नजर खिळवून ठेवतो, तर या फुलांचा गंध थेट हृदयापर्यंत पोहोचत असल्यामुळे ते नेत्र मिटण्यास भाग पाडतात. एकदा आलेला सीतेच्या वेणीचा फुलोरा आठवडाभर ताजातवाना राहतो हे विशेष.

अस्तित्व टिकवून ठेवणं गरजेचं
कोकणात विकास प्रकल्प जोरात चालू झालेत. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करताना रस्त्याच्या बाजूने लावलेले पांथस्थ वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. यात मुख्यतः वड, पिंपळ, उंबर असे वृक्ष होते जे या सीतेच्या वेणीच्या गजऱ्याचे आधारवृक्ष होते. यामुळे या फुलांना आता आसराच राहिला नाही. पुन्हा वृक्षारोपण केले जाईल, पुन्हा वृक्ष मोठे होतील तोपर्यंत या वनस्पतींचे अस्तित्व टिकवून ठेवणं गरजेचं आहे.

बागेत लावण्यासाठी ऑर्किड येथील अधिवासातून उपटून नेले जात आहे. अशा वनस्पती बागेत नेताना त्याची परिसंस्था जात नसते. त्या वनस्पतीला परागीभवन होण्यासाठी लागणारे कीटक जात नसतात. त्यामुळे बायोपायरसीचा प्रश्न ही मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वांवर मात करून पावसाच्या पहिल्या सरीत आपल्या सुगंधाने मोहित करणारे गजरे काहीसे दुर्मीळ होत आहेत- प्रतीक मोरे, निसर्ग अभ्यासक देवरूख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 21/Jun/2025