खारभूमी योजनांची कामे त्वरित पूर्ण करा : भरत गोगावले

रत्नागिरी : कोकण विभागात भरती-ओहोटी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, विविध योजनांच्या लाभ क्षेत्रातील पिकांखालील क्षेत्र नापीक होणे, गोड्या पाण्याचे स्रोत भरतीच्या पाण्यामुळे क्षारयुक्त होणे तसेच लाभक्षेत्रातील गावांना भरती व पुराचा धोका निर्माण होणे आदी समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे वृहत आराखड्यातील नवीन योजनांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी दिले.

गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार किरण सामंत, शेखर निकम, वित्त विभागाचे सहसचिव विजय शिंदे, कोकण विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाचे उपसचिव रोशन हटवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोगावले म्हणाले, सद्यःस्थितीत राज्य निधीअंतर्गत उपलब्ध निधीतून खारभूमी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. तथापि, नुकसानाला तोंड देणाऱ्या आणि भविष्याकालीन धोके लक्षात घेता नव्या खारभूमी योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे अत्यावश्यक आहे.

यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून साहाय्य मिळणे गरजेचे आहे. या निधीतून कोकण विभागातील ६६ खारभूमी योजनांची कामे हाती घेता येतील यासाठी सुमारे ४४२.७९ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, या योजनांमुळे अंदाजे ६.९२० हेक्टर क्षेत्र पुनर्प्राप्त होणार आहे. या कामांना अधिक गती देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 21/Jun/2025